गुरामागचे दिवस

  • दगडू विठ्ठल गायकर

एव्हाना दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. बहुतेक मी असेल पाचवीला.पंचाहतरचा काळ असेल तो. रानातून स्वाती नक्षत्रातीची एखादी पाहाळी आपगी येऊन जायची. गुरं झुरीला लावली की भुरीवर अन् जुंबाडावर नादवायची. अन दिवाळीचा अभ्यास करता करता मी गुरांचं रानात, माळावर पडलेलं वाळुन गेलेलं शेण मग मी गोळा करून त्याचं ढीग लावून ठेवत असे. महिनाभर बरंच शेण गोळा होई तेव्हा लोकांकडं मोकार जितराबं असायची. लोक शेण गोळा करत तर नसतं पण आपण तेंच्या रानातील शेणाला हात लावला की भांडणाचा कहार व्हायचा. भावकी मोकार दुखाळी. ‌लई हाटीवाद करायची. गोळा केलेलं शेणाचं ढीग इसकाटून टाकायची.

आगुदरच शेणकिडे गोळ्या केलेल्या ढिगाचं पार भुसकाट पाडत. मग ते ढिग वेळ मिळेल तसं आखरा म्होरं असलेल्या उकीड्यात टाकायचो.असे दर रविवारी करता करता उन्हाळा येईपर्यंत किमान एक लारी भर खत मी गोळा करत अन् भोरवाडी,वडगाव कांदळी, आर्वी गुंजाळ वाडी ह्या ऊसाच्या पट्ट्यात ते लारीत भरुन ते तिथं गाडी खाली करून तेव्हा पाचशे रुपये हातात पडत. तेवढ्यात बाजरीची दोन पोती सुटत.अन बाकीच्या पैशात वाण्याची उधारी देण्यात जाई.काही दवापान्याला कामाला येई.

रानात गुरं वळता वळता कधी फारीसटात गुरं घुसली की धावड्या अन् बाभळीचा डिंक काढायचा हे ठरलेलं. धावड्याचा डिंक चुलीत आहारावर भाजुन ल ई भारी लागायचा खायला. तो वाण्याच्या दुकानात जाऊन ईकला की अर्धा किलो डिंकात तो एक किलो गुळ द्यायचा. मग पायाला भिंगरी लावून मी रानातील धावड्याची डिंक असलेली झाडं न्याहाळून ठेवायचो अन् महिन्याभरानं काढायचं पण कधी आपण बघुन ठेवलेलं डिंक कुणीतरी सरपानावाले,दारू गाळणारी मंडळी घेऊन जात ,मग माझाच मला खूप राग यायचा. त्या डिंका च्या पैशांत मपली अरधाल्या किमतीतील वरच्या वर्गातील पुस्तके सुटत.उन्हाळा आला की रानात चीटपाखरुबी नसायचं.

चिनकिडा दुपारी आपलं शास्त्रीय संगीत सुरू करायचा. रानात पाणी कुठं बी नसायचं मग मधमाशीच्या मागावर डोंगर कपारी तुडवत गेलो की एखाद्या झुरीत थंड पाण्याचा झरा दिसायचा‌. त्यात साबरीची दोन कांड पिरगाळली की नितळ पाणी व्हायचं.मग मी ते गटागटा पिऊन टाकायचो. पिंपरी च्या पानाने नाहीतर नारळाच्या नरोटीने त्या झ-यातील पाणी शिकाळी लावलेला एक पितळेचा तांब्यात भरायचो ‌.आजतागयत अशी चव कुठेच नाही भेटली . रानात मग बोरं पिकायची हिवाळा संपताना.मोकार बोरं हादाडली की आघु-यावानी भुकेची काय बिशाद जवळपास फिरकायची मग सवसांज झाली की ल इ भूक लागायची.

तिथं घाटाच्या माथ्यावर एक जुनी पिपर होती. काय टपोरी पिपरं असायची….झाड उंचीने जरा खुजं होतं. काळीभोर अन् चवदार पिपरं अधाशावानी खाल्ली की गुरं घेऊन मी घराकडे निघायचो. बुलबुल अन् कोह्याळा ही पाखरं ही त्या पिपरीवर तुटून पडत. अगदी झुंजारता…!कुठं काठवठी पिकत तर कुठं चिकन चोपडं तर कधी खरमाटया पिकत . त्या खाल्या की भूक दरीला नळीत पळून जाई. रानातील खैरा च्या झाडावर असलेलं तपकिरी देखणं मोठाले भुंगे पकडायचे त्यांच्या संग खेळायचो अन् पुन्हा रानात सोडून देई.अन पुन्हा शोधत जायचं.

आडवाटेनं एखादं कोल्हं कुही कुही करत रानात पसार होई. मग हरळीतुन आपगी सशांची जोडीच पायात घुटमळत अन् ते बिचारे वा-या च्या वेगाने गायब होई. कुणा शिका-यानं वढ्याला वाघूर लावलेली असायची त्यात बिचारे सापडत. कधी पाणवठ्यावर आलेली पाखरं त्या दुसऱ्या वाघुरीत सापडत‌.खूप वाईट वाटायचं.

पुढं लगीन सराई आली की लारीतून नवरदेवाचं व -हाड वरच्या पठारावरून खाली दुधवडी भागात जात असत. व-,हाड शिवेवर आलं की कुणीतरी नवरदेवाच्या घरातील मोठा माणूस तो नारळ येशीवर फोडायचा‌. मी ते घराच्या चांधई पासुन बघायचो अन् पाच मिनिटात दोन भले मोठे टेकाड उतरत अन् पुन्हा चढत अनवाणी पायाने काट्याची पर्वा न करता ते नारळ हुडकून काढत‌. ते कुटकं खायची मजा काही औरच….मग आम्ही भावंडं तो नारळ खात.अन मग मी पुन्हा व-हाडाची लारी कधी येईल ह्याची मी वाट बघायचो. दिवसात एक तरी नारळ भेटायचा.असं किमान दोन महिने मजेत निघायचं.

कधी कधी साबरी च्या आत दडलेली नाही तर येहकळीवर असलेली भली मोठी मोहोळं नदरं पडत. धाकटा भाऊ त्याचा एका मिनिटात फडशा पाडायचा.मग मी पितळी घेऊन त्या मधेची धार खायचा.काय अफलातून चव असायची..‌.पण मधमाश्यांना आता काय खायला मिळणार म्हणून मी दुःखी होई…!

मलाबी वाटायचं लारीत बसून व-हाडा च्या गाडीत जावं. ल इ मजा असतात वाडीतील पोरं सांगायची,पण शेळ्यांचे हाल होतील. एखादी कालवड कड्यावरुन पडली तर …?शिवाय जनवाराची भिती…हिवरा च्या शेंगा खाऊन एखादी शेळी दगावली तर.. असं नाना विचार येत...जे टपावर बसले ते पुढं सरपंच, उपसरपंच झाले जे फाळक्यावर बसले ते मागं राहिले अन् मधी माणसात बसणारे जरा चार बुकं शिकले अन् तेवढे माणसात राहिले.माझं व-हाडा च्या गाडीत बसणं शेवटी राहून गेलं…!

एकदा असाच रानात हिंडताना गुंजाचा पाला घावला.ल इ गुळचाट लागायचा तो. तिथं झरा होता .एक भला मोठा परड (अजगर)तिथं पसारला होता‌. सुसतावला होता…बहुतेक त्यानं ससा गिळला असावा. लेंडयावरुंन मी अंदाज बांधला.तशाच मोकार गुंजा गोळा केल्या…घाबरत घाबरत.

तेव्हा लग्नात जेवण ताटं आहेर करायची. त्यात चिमण्या बनवत घरी आहेर भारी उठून दिसण्यासाठी.एकदा आईनं ते जेवण ताट बनवलं अन् चारपडाळीत आहेराला ती पाटी डोक्यावर घेऊन रोहोकडी, धावशी मार्गे मावशी च्या घरी गेली.मी जेवण ताट चिमण्यांच्या डोळ्यात भल्या टपो -या गुंजा घालून सजवले होते.सगळया मांडवात आमचंच ताट भारी दिसत.बायका चाट पडत. कुठलं पाव्हणं आहेत म्हटल्यावर कोण तरी म्हणायचं बांभुड च्या जानकुचं… लागाच्या घाटातील.माझी छाती ५६ इंची व्हायची ते ऐकताना…!

एका मावसभावजयी च्या माहेरचे कोण तरी पाव्हणयांना भूक लागली अन् आमचंच ते गुंजानी सजवलेलं ताट त्या पाव्हणं मंडळी च्या पोटात विराजमान झाले आहेरात न मांडता..मी खूप नाराज झालो पण काय करता…!थोडं फार बंड केलं नंतर ते मोठया मामानं ते लगेच थंड केलं…टाळी झाली.तांदूळ टाकलं अन् जेवणंखावणं झाली अन् मग मी गुरांच्या ओढीनं पायीपायी घरी गेलो एव्हाना वाघाने एक गाय मारली होती. लगीन ल इ महागात पडलं व्हतं तेव्हापासून मग मी मपलं ते गोकुळ सोडून गोतावळ्यात नाही गेलो. तांदूळ टाकायला…बरीच वर्षे…! अगदी माझ्यावर अक्षदा पडेपर्यंत…!✍🏻…

दगडू विठ्ठल गायकर

ठाणे,५/१२/२४