आणि मी शाळेत जावू लागलो
- दगडू विठ्ठल गायकर
मी असेल तेव्हा सहा वर्षांचा.बहुतेक ते ७० साल असावं. नुकत्याच रोहिणी शिवारात झिम्मा खेळून गेल्या होत्या. त्या मातीतून दरवळणा-या त्या सुगंधानं सारं माळरान आनंदून गेलं होतं. सावळ्या गाईला अन् तिच्याही पहिलारू कालवडीनं चैतीपुनवला दोघी मायलेकींनी दोन वासरांना जन्म दिला होता.
मी सकाळीच गुरं गोठ्यातून आखरावर बांधली अन् त्या देखण्या वासरांसंगे खेळू लागलो.तेवढ्यात चार आडदांड पोरं आपगी उभी राहिली पडवीत. मी लगेच विचारलं “काय काम आहे”? त्यातील एक जरा अंगानं संभाजी कावजी असलेला मला बोलला “तुला न्यायला” ते ऐकलं अन् मी बोललो “कशाला ” तसी ती पोरं बोलली “साळत बोलावलंय गुरुजींनी”
शाळेचं नाव ऐकलं अन् मी जी धूम ठोकली ती थेट खाली मळई च्या आडवला. टॉप गिअर घेत मपली गाडी मेरमेरनी…दांडादांडानी नळीच्या कुंडावर जावून थांबली.आईनं चुचकारत मला घरी नेलं. मला आईनं सांगितलं “बाळा आजपासून तू साळत जायचं…! मी ..मी नायजा नायजा म्हणू लागलो. भलं मोठं भोकाड पसरलं अन् पार वासरंही हंबरायला लागली . आईनं गुळाचा काला दिला बांधून एका फडक्यात अन् त्या चार पोरांनी माझी उचलबांगडी केली.

मुकताईचा वड, सत-या वड मार्गे मपली वरात मधल्या घाटावर पोहोचली अन् थोडा विसावा म्हणून त्यांची बोटं थोडं सैल झाली अन् एखादा सराईत गुन्हेगार जसा पोलीसांच्या तावडीतून निसटतो तसी मी धुम ठोकली ती थेट वाडग्याजवळील कलवडाशेजारी. तेथे असलेल्या कोंबड्यांच्या डाल्याखाली मी कोडकं करुन लपून बसलो ती पोरं घरी यायच्या आत. कोंडाजी फर्जंदांना जेव्हढा आनंद झाला नसेल पन्हाळा रातीत चढताना अगदी तसाच एक गड सर केल्याचा आनंद मला झाला होता.
एव्हाना आईनं माझा महापराक्रम बघितला होता.तिची घारीवानी नजर होती माझ्यावर घाटा पर्यंत पोहचेपर्यंत.अन तिला पक्कं ठाऊक होतं की हा एवढ्या सरळ मार्गाने साळत जाणार नाही तेवढ्यात ते चारही वीर खळ्यावर आले .अन ती पोरं आईला म्हणाली ” काकू ” दगडू पळाला… कुठं बी घावना…” एखाद्या सिनेमात जसा एखादा डी आय जी पुकारतो ” भुजंगराव तुम्हाला आम्ही चारी बाजूंनी घेरलय ,गुमान गुहेच्या बाहेर या” अगदी तसच आईने एक भली मोठी आरोळी ठोकली”बाळा डाल्या च्या बाहेर ये”
एव्हाना माझं बिंग फिटलं व्हतं. तिला ठाव होतं की “सरड्याची धाव कुंपणापर्यंत”. मी शरणागती पत्करली दुसरा पर्यायच नव्हता.आईनं माझ्या दोन लवण्या सणकावल्या होत्या. हा आयुष्यातील आईच्या हातचा पहिला अन् शेवटचा मार होता. आता कधी मला प्रश्न पडतो आईनं मला पाठीत थपाटा घातला नसता तर…!
आता आपली बरीगत नाय .आईनं गोडीत समजून सांगितले अन् मी शाळेकडे निघू लागलो. ती पोरं मला घेऊन शाळेच्या वाटेनं घाट चढत होती . माझ्या डोळ्यासमोर”इंजन्या” अन् “थैमा न्या” ही लहान वासरं दिसत होती. एकदाचा पिरपहाडी च्या साळत जाऊन बसलो. एकच गळकी कौलं असलेली अन् त्यात चार वर्गाची चाळीस पोरं अन् जोडीला जेमतेम पाच फूट उंचीची सावळी मुर्ती . बो-हाडे गुरुजी एक दयाळू, मायाळू, हुशार अन् शिस्तबद्ध मास्तर त्या आमच्या शाळेत आम्हाला शिकवायला यायचा दहा बारा उंबरा असलेल्या वस्ती वरून.
शेंबुडद-यातून.मी वर्गात बसलो पहीली च्या पोरांसंगे. मन काही रमत नव्हतं.दोन तास झाले अन् लघवीच्या सुट्टीत पोरं बाहेर आली अन् मी पुन्हा एकदा त्या आयत्या चालून आलेल्या सुवर्ण संधी चा यथेच्छ फायदा उठवत त्या बंदिस्त खोलीतून निसटण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. शिंदे सरकारांच्या वावरतात मुतायला गेलेल्या पोरांनी एकच गलका केला. “गुरुजी दगडू पुन्हा पळाला…मैलभर पळालो अन् पुन्हा लगेच थांबलो.आता परत घरी गेलो तर आपलं भरीत नाही तर ठेचा नक्की होईल म्हणून मी पुन्हा शाळेकडे चालू लागलो .आता गुरुजीच मला न्यायला आले.गुरीजीनं केस जरा गोडीत हाताळली.जवळ घेऊन अन् परत वर्गात बसवलं. मपलं नाव साळत घालायचं हे मास्तर अन् आईचं मंगळवारच्या बांभुड च्या बाजारात ठरलं व्हतं हे मला नंतर कळलं.
एव्हाना मला शाळेची गोडी लागली होती.मी शाळेत जात नव्हतो म्हणून बो-हाडे गुरुजींनी माझ्यावर एक कविताच केली होती. गुरूजी पोरांना ती कविता गायला सांगत.ती अशी होती ” बैलांचा नाद माझ्या दगडूला हाय रं…साळमंदी येत नाही करावा काय रं…?”
एका वर्गात गुरुजी पहिली अन् दुसरीची पोरं बसवत.अन पडवीत तिसरी अन् चौथी.एका वेळी तो एक मास्तर चार वर्गांना कसं शिकवत असेल मला एक न उलगडलेले कोडे आहे. मी तिसरीला असतानाच चौथीचा अभ्यास यायचा. कवितेची मला गोडी लागली होती. अन् म्हणून आता साळंचीही लइ गोडी लागली होती. आई कधी म्हणायची “आज घरी राहतो का…! मला गुरं वळू लागायला “मी”मी नाय जा ..मी नाय जा चा पाढा वाचू लागलो.आईला पोराला साळची गोडी लागली म्हणून ती हारीक(आनंदी) झाली.
चौथीला रात्री अभ्यासाला पिराच्या वाडीत जायचं . गुरूजींच्या घरी.गुरांची पडवीच होती ती.मी घरुन शिरवाळ पडता निघायचो. अंधार चोंडी अन् गाढवमाळातून कधी सवसांज होत पर्यंत तर कधी गडात पडेपर्यंत पोहचत असे. गोधड्यांची वटकळी करुन सकाळीच झुंजारता जे धूम ठोकायची पी टी उषा वानी थेट दोन मैलाचं अंतर दहा मिनीटात .पायात बोरी बाभळीचं काटं अगदी गुण्यागोविंदाने नांदत बारोमास…सालोसाल…!
झालं.हा हा करता चौथी पास झालो. मी केंद्रातून पहिला आलो होतो. आता पुढं पाचवीला चार मैलांवर बांभुडला. उन्हाळ्यात करवंद तोडायची अन् गावात विकायची. त्या तीन रुपायात मी पाचवी ची अरधाली किंमतीची पुस्तकं विकत घेतली अन् शाळा सुरू व्हायच्या आत गुरामागं सगळी वाचून काढली. पाचवी,सहावी अन् सातवीला मी पहिला आलो. माझ्या अंगावरचे फाटक अन् तेच कपडं बघून हासे गुरुजीना माझी दया आली.अन त्यांनी त्यांच्या अंगाचा एक कबराबांडा बुचकोट मला दिला. मी एवढा खुश झालो की थेट पळत घरी गेलो अन् तो घालून बघितला.मोकार डगळा होता तो. आईनं तो जरा आपरा करून घेतला पण जरा आवाळच झाला अन् मग मी तो काही चांगला दोन महिने अंगावरून काढलाच नाही.
गावात चार मैल पायपीट करायची. सकाळीच पाच लिटर दूध, दळणाची पिशवी अन् मंगळवारी अंडी घेऊन घाट चढायचो. एकदा तर बाजरी च्या दळणात अंडी फुटली अन् घान्यवळणातच तिचं आम्लेट झालं. ल इ रडलो . त्या गडबडीत दूधाची किटली डोक्यावरुन पडली . निम्मे दूध गंगेला गेलं. शाळेत प्रार्थना सुरू व्हायच्या अन् मी दूधा च्या लाईनीत उभा असायचो डेअरीत. कवायती सुरू झाल्या की फिट ,मिरगी येऊन पडायचो. पोटात काही नसल्याने पार हेबाळून जायचो अन् मग तव्हारी यायची. पोरी म्हणत सर “दगडू पडला…!”
आठवीला गेलो अन् त्या वेळी इंग्लंड क्रिकेट संघ भारतात आला होता. रविवारी इळमाळं गाणी ऐकायची. बातम्या ऐकायच्या अन् गुरमागं कॉमेंटरी. अन् व्हायचं तेच झालं. माझी गाडी एक नंबर प्लॅटफॉर्म वरुन थेट तीन नंबर वर गेली. मी उगले सरांचा सगळ्यात लाडका अन् हुशार विद्यार्थी. त्या वर्षी खामुंडी वरुन गावात शिकायला आलेला भालेराव नावाचा एक मुलगा पहिला आला. निकाल लागला अन् उगले सर बोलले “दगडू उभा रहा अन् हात पुढे कर” मी बोललो सर” मी काय केले “अन् उगले सरांनी खास ठेवणीतील बनवुन घेतलेल्या बाभळीच्या रुळांनी माझी चार बोटं पहील्यांदाच कुणीतरी लाल केली. सर बोलले मी तूला मारलं कारण तुझी गाडी घसरली.अन मग मी असा पेटवून उठलो की नववीत पहिला आलो. उगले सरांनी मला जवळ घेऊन तेच रडायला लागले.
समद्या पोरात मपलं इंग्रजी सगळ्यात भारी. पैकी च्या पैकी पडत. पोरं चाट पडत. ग्रामर तर डाव्या हातचा मळ झाला होता. निबंध स्पर्धेत अन् भाषण स्पर्धेत मी सातवीत नंबर काढला होता. पुढं दहावीत गेलो. दहावीत फक्त एकच तुकडी जेमतेम ३२ -३३ पोरं असतील .एक महीनाभर मी शेवटच्या बाकावर बसलो. कारण सगळे गायकर पाठीमागे एकाच रांगेत मागच्या बेंचवर. त्यातील काही पोरं जांब उनाड. वर्गातच गायछाप खात. काही गाझा पट्टीवाले पाठीमागून कागदाचे मिसाईल सोडत एखादं सावज हेरून. लांडग्या च्या बिया शर्टावर पुढच्या पोरावर फेकून मारत. कसल्या तरी बिया उगाळत अन् पुढच्या पोरांना चटके देत. पोरं “आयव बाबव ” करत.
गणिताचे बंगाळ सर गणिताच्या तासाला वर्गात शिरे पर्यंत पोरं मोकार दंगा करायची. अन् सर यायच्या आत एखाद्या बापू किंवा स्वामी महाराज यांच्या सत्संगात लोक जसे बसत तसे ती सोंग करत. गणित शिकवणारा बंगाळ सरांसारखा मास्तर उभ्या महाराष्ट्रात घालणार नाही. पोरांचे कान असे पिळत ते अतिरेकी आयव बाबव करत. माझं नशीब मला तो सत्यनारायणाचा प्रसाद भेटला नाही. उगले सरांनी मला उनाड परिवारुतून उचलून एक दिवस थेट पुढच्या बेंचवर पोरीं शेजारी बसवलं. मी मुलींना खुप लाजायचा अन् घाबरायचा. मधल्या सुट्टीत पाठीमागे बसलेली ती खोडकर पोरं म्हणायची ” च्या मारी दगडू ची भारी मजाय” मला काही कळायचं नाही. ती पोरं असं बोलतात म्हणून मी पोरींना सांगितले अन् सरांनाही .दोनही पक्षांकडून त्या चांडाळ चौकडीचा “करेक्ट कार्यक्रम” झाला…!
पुढं दहावीला परिक्षेला अकोले तालुक्यातील अगस्ती विद्यालयात गेलो. रात्री काही पोरं पिंजरा पिक्चर बघायला गेली. उदया इंग्रजी पेपर. मी अन् अजुन एक वागदरा येथील गायकरांचा एक मुलगा तेवढेच खोलीत अभ्यास करत होतो. दिवस उजाडला.पेपर हातात पडला. मी अक्षर असल्याने दुसऱ्या बाकावर. माझ्या मागे G वरुन एक अतरंगी होता .तो पाठीमागून मला सारखेपाय मारायचा. मला उत्तर दाखव म्हणायचा . मी नाही म्हणत पण तो काही ऐकेना शेवटी त्याने उत्तरे बघीतली काही पाठीमागे सरकवली अन् अशा रितीने सगळेच गायकर इंग्रजी पास झाले.
पण दुर्दैवाने पुढच्या बाकावरील पहिले दोघेजण की जे त्या रात्री पिक्चर बघायला नाही गेले त्यानीच शारदेची उपासना केली.पुढं शिकले ब-यापैकी पुढं गेले अन् आयुष्याचा जीवंत बोलपटच उभा केला.
दहावीचा निकाल लागला.माझा एका गुणाने पहिला क्रमांक हुकला होता .दुस-या दिवशी उगले सरांनी पाठीवर थाप टाकली. मी इंग्रजी ला तालुक्यांत पहिला आलो होतो चाटे माटे ह्यांच्या कुरणात न चरता…कडमेरला खुरासणी पेरता पेरता…अन् हातात थैमान अन् इंजान्या नांगरीला धरता धरता…! पेढे वाटायला पैसं नव्हतं. मग पेढं नाही वाटलं अन् त्याच काही वाटलच नाही…! आता मी पुढील शिक्षणासाठी ओतूरला अण्णासाहेब वाघीरेत प्रवेश घेणार होतो.
खेद अन् खंत एवढीच वाटते ज्यांनी माझी उचलबांगडी केली त्यांनी तिसरीतच शाळेला” तूला हा अखेरचा दंडवत” म्हटलं अन् ज्याला उचलून नेलं त्यानं थेट लागाच्या घाटातून… डोंगराच्या पोटातून….ते थेट नर्मदेच्या काठापर्यंत अन् कावेरी च्या तटांपासून ते यमुनेच्या पाटा पर्यंत आपल्या पावलांचे ठसे त्या मातीत उमटवले होते. ठसे उमटविणयासाठी पावलं वेगात अन जोरात टाकावी लागतात…!बो-हाडे गुरुजी अन् उगले सरांनी ह्या दगडाला आकार दिला…जर उगले सरांनी त्या रूळानं तो प्रसाद मला दिला नसता तर..!. उभ्या आयुष्यात एकदाच अन् एकाच मास्तर चा उल्साक मार खाल्ला अन् तेही पावलं पुढं पडावी म्हणून…! आपल्या क्षेत्रात “Master ” व्हावे ह्या उददेशानेच…!…
दगडू विठ्ठल गायकर
८/१२/२०२४(‘ पालघर)
